स्वागत

एका गुजराती गझलकाराच्या मराठी गझलेच्या ह्या ब्लॉगवर आपले स्वागत. मी हेमंत पुणेकर. २००३ पासून पुण्यात आहे पण मूळचा बडोद्याचा. शालेय शिक्षण व ग्रेज्युएशन बडोद्यातून झाले. गुजराती गझल क्षेत्राशी नातं जुळलं ते २००६ पासून. माझी गझलेविषयीची समज घडविण्यात गुजरातीचे सध्याचे नामवंत गझलकार सुरतेचे डॉ. रईश मनीआर आणि बडोद्याचे विवेक काणे व मकरंद मुसळे ह्यांचा मोठा वाटा आहे.

गुजराती गझल परंपरा किमान दीडशे वर्ष जुनी आहे. सुरूवातीचे गुजराती गझलकार उर्दु गझल परंपरेशी जोडलेले असल्याने ती परंपरा गुजराती गझलेला वारश्यात मिळाली. गुजरातीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर जाणवतं की मराठी गझलेत काही विचार – खास करून तंत्राविषयीचे उर्दू-फारसी परंपरेचे विचार – फारशे रुजलेले नाही. ह्या विचारांना मराठीतून मराठी गझलकार व अभ्यासकांपुढे ठेवण्यासाठी हा ब्लॉग. मराठी गझलकारांनी ह्या परंपरेचा स्वीकार करूनच गझल लिहावी असा माझा बिलकुल आग्रह नाही. पण ज्या परंपरा अरबी, फारसी, उर्दू, हिन्दी व गुजरातीत चालल्या त्यांचा परिचय देणे, त्यावर चर्चा घडवून आणणे व त्याचा प्रयोग मराठीत कसा होऊ शकतो ह्याचे उदाहरण पुढे ठेवणे एवढा नक्कीच आहे.

तंत्रा व्यतिरिक्त पण मराठी गझलेला गुजराती गझलेच्या पृष्ठभूमीवर तपासायचा प्रयत्न आहे. आशा आहे तुम्हाला हा प्रयत्न आवडेल.

Leave a comment