गेल्या मनातून इच्छा – डॉ. रईश मनीआर यांच्या गझलेचा मराठी अनुवाद

पोस्ट्च्या सुरुवातीलाच व्हिडिओ ठेवायचे कारण एवढेच की वाचकांनी अनुवादित गझल वाचण्या आधी ऐकावी. अनुवादाची भाषा बोलाचालीच्या भाषेच्या शक्य तितकी जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे. भाषा वापरायची उर्दू पद्धत इथे वापरलीए – सुटया/शब्दांती येणार्या गुरूचा लघु उच्चार स्वीकार्य आहे.

मनथी महेच्छा गई तो स्वयं मन रह्युं नहीं      गेल्या मनातून इच्छा म्हणून मन न राहिले
वृक्षो कपाई जातां पछी वन रह्युं नहीं          वृक्षांना कापल्याने आता वन न राहिले

लीधो जो पथ अलग, प्रथम ओझल थई दिशा   पथ घेतला नवीन, हरपले दिशेचे भान
पाछळ वळीने जोता समर्थन रह्युं नहीं         मागे वळून पाहता समर्थन न राहिले

साची मजा सफरनी मळी ए घडी मने         तेव्हा खरी मिळाली प्रवासातली मजा
ज्यारे गतिनुं कोई प्रयोजन रह्युं नहीं          जेव्हा गतीचे काही प्रयोजन न राहिले

शोधे छे ए गझलमां, गुमाव्या पछी मने       गमवून मला ती शोधते गझलेत आजकाल
ज्यारे गझलमां आत्मनिवेदन रह्युं नहीं        गझलेत जेव्हा आत्मनिवेदन न राहिले

सत्ता जो विस्तरी तो वध्यो शत्रुभाव पण       सत्तेत वाढ झाल्याने शत्रुत्व वाढले
जो स्नेह विस्तर्यो, कोई दुश्मन रह्युं नहीं       जर स्नेह वाढला, कुणी दुश्मन न राहिले

कुंभारे दई दीधो छे मने लिस्सो घाट पण…    कुंभाराने दिला मला आकार गुळगुळीत
कुलडी पर आंगळी तणुं लेपन रह्युं नहीं        पण भांड्या वरती बोटाचे लेपन न राहिले

– रईश मनीआर                                               –  मराठी अनुवाद हेमंत पुणेकर

वृत्तः- गा गालगाल गाललगा गालगाल गा

Posted in Uncategorized | Tagged , | Leave a comment

जेव्हा माझ्या सोबत असतो

जेव्हा माझ्या सोबत असतो
तो असतो पण कितपत असतो

कोठे हुज्जत घालत असतो?
मी सर्वांशी सहमत असतो

इकडे बुद्धी रोखत असते
तिकडून मोह खुणावत असतो

स्टेशन आले की तो* उतरणार”
कोण कुणाच्या सोबत असतो!

मग मी काय ठरवले असते
मी जर सारे ठरवत असतो

राख जरी दिसते वरच्यावर
आत निखारा धुमसत असतो

तेच अडीच अक्षर ना जमले
रोज मी* कित्ता गिरवत असतो

– हेमंत पुणेकर

वृत्तः- गागागागा गागागागा

चार गुरूंचं एक अशे दोन आवर्तन. प्रत्येक आवर्तनातल्या दुसर्या आणि चौथ्या गुरूंच्या ऐवजी दोन लघु वापरायची सूट असते. अन्य गुरूंचे दोन लघु स्वीकार्य नाही.

* = एकाक्षरी गुरुचा लघु
” = पादांती येणार्या लघुचा लोप

गझल पठनः- (गझल काव्यप्रकाराची फार ओळख नसलेल्या मित्रांसाठी म्हणून कुठेकुठे थोडासा अर्थविस्तार केलाय. खरंतर कवीने काही बोलू नये आणि कवितेला बोलू द्यावं हीच पद्धत आहे. तर जाणकारांची आधीच माफी मागतो!)

Posted in Uncategorized | 1 Comment

व्यंजन-स्वर संधीचा वृत्तानुकूलते साठी वापर

१) ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्न्‍यः कृतः।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रोऽअजायत॥१३॥
— पुरुषसुक्त

२) सदा बोलण्यासारिखे चालताहे।
अनेकीं सदा एक देवासि पाहे॥ — समर्थ रामदास स्वामी

३) करो लाख तुम मातम-ए-नौजवानी
प ‘मीर’ अब नहीं आयेगा वोह ज़माना — मीर तकी मीर

वेगवेगळ्या शतकात लिहिल्या गेलेल्या ह्या ओळींमधे एक समानता अशी की तिन्ही उदाहरणांमधे वृत्त सांभाळायला एका व्यंजनाशी त्याच्या पाठोपाठ येणार्या स्वराची संधी केलेली आहे.

१) पहिले उदाहरण अनुष्टुप मधे आहे. पहिल्या ओळीत ब्राह्मणः अस्य = ब्राह्मणोऽस्य असे केले. अस्यचा अ ब्राह्मणोच्या णो मधे संमिलित केला. दुसर्या ओळीत दुसरे आठ अक्षरी पाद पूर्ण करायला शुद्रः अजायत = शुद्रोऽअजायत करून सोडून दिले “अजायत” चा अ शुद्रो च्या द्रो मधे संमिलित केला नाही. अशे प्रयोग वैदिक संस्कृत मधे दिसतात. अभिजात संस्कृतमधे संधी असेल तिथे संधी करायचीच असा नियम आहे.

२) “सदा बोलण्या सारखे चालत आहे” सामान्यतः मराठीत आपण असंच लिहितो. “चालत आहे” चे चार गुरुंचे वजन वृत्तात बसणार नाही. पण “चालत + आहे = चालताहे” अशी संधी करून वृत्त सांभाळले आहे. ही मोकळीक भाषाच देते कारण चालताहे, बोलताहे अशे संधी केलेले शब्द प्रयोग त्या काळातल्या मराठी भाषेत प्रचलित होते.

३) “प ‘मीर’ अब नहीं आयेगा वोह ज़माना” मधे “प मीर अब” चे वजन “ल गाल गा” असे वाटत असले तरी “मीर + अब = मीरब” (उच्चारानुसार लिहिले तर मीर् + अब् = मीरब् ) अशी संधी करून वृत्त सांभाळले आहे.

गझलेचा उद्भव जरी अरबी भाषेतून झाला असला, तिचा खरा विकास फारसीतून झाला. फारसी आणि भारतीय भाषेंचे मूल “प्रोटो इन्डो-युरोपियन” (ऋग्वेदातल्या संस्कृत आधीची भाषा) असल्याचे मानले जाते. ह्या कुलातल्या भाषेंमधे संधी जोडण्याची परंपरा इतकी प्रचलित आहे की त्यांना “संधी-साधू” म्हणायला ही हरकत नाही.

कवी वृत्ताचे बंधनं पाळायला भाषेला शक्य तेवढी वाकवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा संधींच्या नियमांचा वापर पण केला जातो. उर्दू-हिंदी आणि गुजराती कवितेत (खास करून गझलेत) ह्याचे बरेच उदाहरण दिसतात. मराठीत पण मला हे एक उदाहरण सापडले.

—————————————————————————————-

मध्यकालात फारसी ही जवळपास पूर्ण भारतात राजभाषा झाली होती तेव्हा फारसीच्या उच्चारपद्धतीचा आपल्या भाषेंचा उच्चारावर परिणाम झाला. आपण शब्दांती येणार्या व्यंजनांचे हलन्त स्वरूप वापरायची सुरुवात केली. “दार” ह्या शब्दाचा उच्चार जवळपास “दार्” असाच झालेला आहे. हे तपासायला म्हणून “दार” आणि दार्शनिक अशे दोन शब्द रेकॉर्ड केले आणि SoundRuler (soundruler.sourceforge.net) नावाच्या मोफत सोफ्टवेरची मदत घेऊन प्रत्येक श्रुती बोलायला किती वेळ लागतोय हे तपासले. हे सर्व attached इमेज मधे दाखवलेले आहे.

गुरू श्रुतीला जवळपास ०.३ सेकंड, लघु श्रुतीला ०.१५ सेकंड आणि अर्ध लघु श्रुतीला ०.०५ सेकंड एवढा वेळ लागतोय. ह्यात +/-०.०२५ सेकंडची अनिश्चितता आहे.

“दार” म्हणतांना “र” च्या उच्चाराला लागणारा वेळ “दार्-शनिक” म्हणतांना “र्” च्या उच्चाराला लगणार्या वेळापेक्षा फारसा वेगळा नाही. हे ऐकायला पण येतं. पण SoundRuler च्या आलेखांनी पण ते सिद्ध होतं.

जेव्हा आपण दार चं बहुवचन “दारं” असं म्हणतो तेव्हा “रं” ही पूर्ण लघु श्रुती होते. ऑडियो क्लिप मधे या शब्दांचा उच्चार आहे. ऐकायला विनंती.

लघु श्रुती पेक्षा जवळपास अर्धा वेळ घेणारी श्रुती म्हणजे अर्ध लघु. आता या अर्ध लघु श्रुतीचे अधीक पाव आणि पाउण वगेरे तुकडे करण्याची गरज मला तरी जाणवत नाही, कारण तेवढा लहान फरक आपण ऐकूच शकणार नाही.

तर दार उघड ची “दार् + उघड” अशी संधी करायची शक्यता निर्माण होते. दोन उदाहरणः

गालगा गालगाल गागागा

चालत आलोय दूरवर आपण
चालता आता परत कशे जाऊ?

दार उघड एवढे म्हणालो तर
दार अधिक घट्ट बंद होताते

इमेज बघा, ऑडियो क्लिप मधे उदाहरणांचे पठन ऐका आणि स्वतःच ठरवा की तुम्हाला हे सर्व तर्कबद्ध वाटतं की नाही. कुणा अश्या व्यक्तिचे मत पण घेऊन बघा ज्याचा कवितेच्या तंत्राशी फारसा संबंध नाही. तो जास्त निश्पक्ष मत देऊ शकेल.

मला तरी असं वाटतं की व्यंजन-स्वर संधीचा उपयोग मराठीत सहज होऊ शकतो. आपली भाषा संधीला अनुकूल आहे. उच्चाराला होणारे नुक्सान कमीत कमी आहे. रचनेसाठीची मोकळीक वाढते.

dar_darshanik

Audio clip:-
https://www.youtube.com/watch?v=iMOulleHwNE

Posted in Uncategorized | Leave a comment

उर्दू-गुजराती गझलेची वृत्त परंपरा व पारंपरिक भारतीय पिंगळाशी त्याची तुलना.

गझलेच्या वृत्तांची परंपरा आणि पारंपरिक भारतीय पिंगळ ह्याची तुलना करतांना दोन विषयांचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. १) गझलेचे वृत्त काय आहेत २) ह्या वृत्तांमधे सूट कशी घेतात.

गझलेचे वृत्तः-
डॉ. रईश मनीआर गुजरातीतले प्रतिष्ठित गझलकार व गझल अभ्यासक आहेत. डॉ. रईश मनीआर ह्यांच्या “गझलनुं छंदोविधान” ह्या पुस्तकात ह्या वृत्तांचा उहापोह केलेला आहे. गझलेत कोणते वृत्तं किती प्रमाणात वापरले जातात हे जाणून घेण्यासाठी त्यांनी 346 गुजराती आणि 437 उर्दू गझलांचे अशा 783 गझलांचे वृत्तं तपासले. त्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघतो की 95% पेक्षा जास्त गझलांमध्ये फक्त 31 वृत्तं वापरलेले आहेत. ह्या अरबी-फारसी वृत्तांमधे दडलेले नियत मात्रांचे आवर्तन ध्यानात घेऊन त्यांना आपल्या पिंगळशास्त्राच्या चौकटीत बसवतांना “अतीचुस्त मात्रावृत्त” असं म्हटले आहे. आपल्या अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्तांशी त्यांची तुलना केल्याने खालील निष्कर्ष काढता येतात.

१) अक्षरगणवृत्तांशी साम्य आणि मात्रावृत्तापेक्षा वेगळेपणाः-
१.१) लघु गुरूचे क्रम बदलत नाही. मात्रा समान असल्या तरी गझल परंपरेने स्वीकारलेल्या लघु-गुरूच्या क्रमांपेक्षा (गणांपेक्षा) वेगळे क्रम (गण) वापरत नाही.
१.२) दोन (स्वतंत्र) लघुंचा एक गुरू करत नाही.

२) अक्षरगणवृत्तांपेक्षा वेगळेपणा आणि मात्रावृत्तांशी साम्यः-
२.१) नियत मात्रांचे आवर्तन आहेत
२.२) दोन (जोडलेल्या) लघुंना एक गुरु म्हणून धरतात
२.३) एका गुरूला दोन (जोडलेल्या) लघुं मधे तोडता येतो

अक्षरगण वृत्तांमधे दोन लघुचा एक गुरू किंवा एक गुरूचे दोन लघु करत नाही. मात्रावृत्तांमधे हे मान्य आहे. सध्या मराठी गझलेत गणवृत्त वापरतांनाही २ लघु = १ गुरू हे सूत्र वापरलं जातं. गझलेच्या वृत्तांमधे २ जवळजवळ येणारे लघु जोडलेले आहे कि स्वतंत्र त्या अनुसार त्यांचा एक गुरू करायचा कि नाही ते ठरवले जाते.

जोडलेले आणि स्वतंत्र लघुः

जोडलेले लघुः- सध्या “दिवस” हा शब्द मराठी गझलेत ललल, लगा किंवा गाल ह्या तीन्ही मापात वापरला जातो. गुजरातीत पण गीत, सॉनेट मधे अशे वजन वापरलेले दिसतात. संस्कृत उच्चार प्रणालिप्रमाणे हे तीन्ही माप बरोबर आहेत. पण मध्यकालात फारसी भाषेचा भारतीय भाषेंवर प्रभाव पडला आणि भारतीय उच्चार पद्धती बदलली. आज “दिवस” ह्या शब्दाचा उच्चार “दि-व-स” असा ललल, किंवा “दिव्-स” असा गाल न राहून “दि-वस्” असा झालेला आहे आणि त्याचे नैसर्गिक माप “लगा” अशेच आहे. “वस्” हे जोडलेले लघु आहेत. हे एक गुरू म्हणूनच वापरता येतात त्यांना दोन स्वतंत्र लघु म्हणून वापरता येत नाही.

स्वतंत्र लघुः- सुकुमार, कुविचार, अतिशय ईत्यादी शब्दातले पहिले दोन लघु स्वतंत्र उच्चाराचे लघु आहेत. “लघु” हा शब्द पण दोन स्वतंत्र लघुंचंच उदाहरण आहे. लोककला, दंतकथा वगेरे शब्दात मधले दोन लघु स्वतंत्र लघु आहेत. तह्या दोन लघुंना दोन स्वतंत्र लघु म्हणूनच वापरावे लागतात त्यांचा एक गुरू करत नाही.

शब्दांचे प्रचलित उच्चारानुसार घ्यायचे वजन आणि जोडलेले आणु सुटे लघु ह्या विषयावर अधिक चर्चा ह्या लेखात “लघु गुरू चर्चा” भागात आहेः- http://gazalkar14.blogspot.in/2014/10/blog-post_82.html

मराठीला हे नियम लावले तरः-
१) हे नियम मात्रावृत्तांपेक्षा जास्त बंधनकारक आहेत त्यामुळे ह्या नियमांचे पालन करून लिहिलेली रचना मराठीत पण गणवृत्तात लिहिलेल्या रचनेसारखीच वाटेल
२) शब्दांच्या प्रचलित-नैसर्गिक उच्चारांप्रमाणे वजन घेतल्याने वृत्तबद्ध पठन करतांना शब्दांचे उच्चार बोलल्या जाणार्या मराठीच्या जास्त जवळ येतील

गझलेच्या वृत्तांमधे सूट कशी घेतात:-
शब्दांचे नैसर्गिक वजन हा मूलमंत्र. सुटींचे सर्व नियम त्यातूनच तयार होतात. दोन वाक्यात सांगायचं म्हटलं तरः
१) शब्दांती आणि सुटा एकाक्षरी गुरू लघु म्हणून घेता येतो.
२) भाषेत वारंवार वापरले जाणार्या काही शब्दांमधे बरेच गुरू लघु म्हणून चालतात. मेरा, तेरा, कोई वगेरे शब्द गागा, गाल, लगा, लल ह्या सर्व मापांमधे चालतात.

असं करून ही वृत्तबद्ध पठनात शब्दाच्या संप्रेषणाला/संज्ञापनाला हरकत येत नाही. ह्या विषयावर अधिक चर्चे साठी माझ्या ब्लॉग वरचा हा लेख बघाः- https://hemgazal.wordpress.com/2014/12/03/soot/ विवेक काणेंची एक मराठी गझल ह्या सुटी घेऊन लिहिलेली आहे. त्याचे वृत्तबद्ध पठन ऐका. त्याचे मराठी उच्चार कुठेही कानाला डाचत नाही असं माझं मत आहे. – https://hemgazal.wordpress.com/2014/11/04/lapvaavi_najar-2/

मराठी गझलेत ह्या सुटी वापरल्या तर:-
गझल रचनेला मोकळीक मिळेल. जरी लिपी अनुसार रचना वृत्तात दिसली नाही, उच्चारानुसार ती वृत्तबद्धच असेल. मराठीत सुटींचे सर्व नियम जशेच्या तशे लागू होणार नाही. गुजरातीत पण उर्दूचे सर्व नियम जशे च्या तशे लागू केलेले नाही. पण ह्या सुटींचा नियमांमागे किमान १००० वर्षाची परंपरा आहे. तर ह्याच्यांतलं काय मराठीत घेता येईल आणि काय नाही ह्याचा अभ्यास व्हायला हवा.

Posted in Uncategorized | Leave a comment

विवेक काणे ‘सहज’ ह्यांच्या गुजराती गझलेचा मराठी अनुवाद

सहज ह्या टोपणनावाने लिहिणारे विवेक काणे हे उर्दू-गुजरातीचे नामवंत गझलकार. त्यांच्या एक प्रख्यात गुजराती गझलेचा मराठी अनुवाद करण्याचा हा प्रयत्न. आज विवेकजींचा वाढदिवस पण आहे. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

कशुंक साम्य तो छे साचेसाच कठपुतळी       समानता ही कशी आपल्यात कठपुतळी
तने हुं जोउं अने जोउं काच कठपुतळी           तुला मी बघतो कि बघतोय काच कठपुतळी

आ तारुं नृत्य ए मारी ज कोरियोग्राफी          तुझे हे नृत्य ही माझीच कोरियोग्राफी
नचावुं जेम तने एम नाच कठपुतळी            मी नाचवेन तुला तैसे नाच कठपुतळी

हलनचलन अने चैतन्य खेल पूरतुं छे           हलनचलन आणि चैतन्य खेळ संपेस्तोवर
जीवंत होवाना भ्रममां न राच कठपुतळी        जीवंत असण्याचा भ्रम का मनात कठपुतळी?

समान हक ने विचारोनी मुक्तता ने बधु        समान हक्क, विचारांची मुक्तता अन् काय
जे मारी पासे नथी ए न याच कठपुतळी         नको ते मागू जे नाही मलाच कठपुतळी

‘सहज’ नचावे मने कोक गुप्त दोरीथी          ‘सहज’ मला कुणी नाचवतं गुप्त दोरीने
ने तारी जेम छुं हुं पण कदाच कठपुतळी        तुझ्या समान मी आहे स्वतःच कठपुतळी

– विवेक काणे “सहज”                           – अनुवाद हेमंत पुणेकर

वृत्तः- लगाल गाललगा गालगाल गागागा

ह्या वृत्ताचे मराठी उदाहरणः-
कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला – सुरेश भट

मराठी अनुवादात पण गुजरातीत वापरलेलं वृत्तच वापरलंय. सुट्या आणि शब्दांती येणार्या एकाक्षरी गुरूंची मात्रा लघु मोजायची पद्धत उर्दू-गुजरातीत आहे. शब्दाला लागणारा प्रत्यय पण सुटा एकाक्षरी गुरू म्हणून धरला आहे. ह्या सुटी घेतल्यानंतर पण गझलेचं वृत्तबद्ध पठन कुठेच अडखळत नाही असं आमचं (गुजरातीत लिहिणारे मराठीभाषी गझलकारांच) नम्र मत आहे.

विवेक काणे त्यांच्या टोपणनावाचा उपयोग मक्त्यात फक्त करण्यासाठी म्हणून नाही तर तो अर्थपूर्ण होत असेल तरच करतात हे पण नोंदण्यायोग्य आहे.

हेमंत पुणेकर

 

Posted in Uncategorized | 4 Comments

सुरेशभटांचे सूक्ष्म (subtle) शेर

उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली!

–> हा शेर आपण आशाताईंच्या आवाजात अनेकदा ऐकला आहे. अगदी सोपा दिसणारा शेर खुप प्रगल्भ आहे. तारकांना आवाज नसतो मग उरात चांदण्याचे आवाज कशे उरले? आकाश जणू एक चादर होते आणी त्यात धातुचे चकचकित तारे होते. रात्र जातांना चादरी सारखे ते आकाश उचलून गेली आणी ते उचलून जातांना तार्यांचा जो आवाज झाला तो उरात उरला आहे. आहाहाहा….. भट साहेब, आम्ही केवळ नतमस्तक होउ शकतो!

गुजराती गझलेच्या परंपरेशी चांगली ओळख असल्याने मी त्या परंपरेच्या उजेडात मराठी गझलेला पहातो. गुजराती गझल साठी १९१० ते १९५० पर्यंत परंपरेचा काळ होता पण दुसर्या विश्वयुद्धा नंतर आधुनिक गझलेचा उदय झाला. त्या काळात परंपरेपेक्षा वेगळे विचार, वेगळ्या कल्पनांना वाव मिळाला आणी गुजराती गझलेने एक नवीन टप्पा गाठला.

सुरेश भट म्हणजे मराठी गझलेच आद्यदैवत! त्यांच्या गझला वाचतानां असे जाणवते की त्यात काही अशे विचार, कल्पना आहेत ज्यांना गुजरातीत आधुनिक गझलचे लक्षण मानलेले आहेत. एक शेर आपण वर पाहिला. हे शेर खुपच सूक्ष्म, नाजुक, नवीन दृश्यात्मक कल्पना घेउन येणारे आणी ठसठशीत आहेत. ह्या शेरांकडे जेवढे लक्ष द्यायला हवे, त्यांची जेवढी चर्चा व्हायला हवी तेवढी चर्चा मराठी साहित्यात झालेली नाही असं वाटतं.

मला आवडलेल्या अश्या काही निवडक शेरांची सूची तयार केली आहे, आशा आहे तुम्हाला आवडतील. प्रत्येक रसरशित शेर नुसता वाचायचा नाही तर चघळायचा.

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!

कोण जाणे कोण हे जवळून गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!

या दुपारी मी कुणाला हाक मारु?
ओळखीचे चेहरे वितळून गेले!

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते

जरा तुझ्या अंगणात आलो उनाड वाऱ्यासवे उडालो
अता फुलांना विचार, ‘येथे खरेच का एक पान होते?’

म्हणू नका आसवात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले
उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते

Posted in Uncategorized | 1 Comment

गझलेत “गागागागा”च्यां आवर्तनांचा उपयोग कसा करतात?

तन्हाँ  तन्हाँ  मत  सोचा कर
मर  जाएगा  मत  सोचा कर

प्यार घड़ी भर का ही बहुत है
झूठा, सच्चा, मत सोचा कर

अपना  आप  गवाँ  कर तू ने
पाया है क्या, मत सोचा कर

जिसकी फ़ितरत ही डसना हो
वो तो डसेगा, मत सोचा कर

धूप  में  तन्हा  कर  जाता  है
क्यों यह साया, मत सोचा कर

राह कठिन और धूप कड़ी है
कौन आएगा मत सोचा कर

वह  भी  तुझ  से  प्यार  करे है
फिर दुःख होगा,मत सोचा कर

ख़्वाब, हकीक़त, या अफ़साना
क्या  है दुन्या  मत  सोचा  कर

मूँद   ले  आँखे  और  चला चल
मंज़िल, रस्ता,  मत सोचा कर

दुन्या  के    गम  साथ  हैं   तेरे
खुद को  तन्हा  मत  सोचा कर

जीना    दूभर     हो     जाएगा
जानाँ,  इतना  मत  सोचा  कर

मान मेरे ‘शहजाद’  वगरना
पछताएगा, मत सोचा कर

फ़रहत शहज़ाद

वृत्तः- गागागागा X 2

ह्या गझलेचं वृत्त तपासलं तर कळेल की प्रत्येक ओळीत गागागागा चे दोन आवर्तन आहे. हे वापरतांना मात्रावृत्तांमधे जरी कोणत्याही दोन गुरूंना लघु करण्याची सूट असली तरी गझलेत फक्त दुसर्या आणि चौथ्या गुरूला दोन स्वतंत्र उच्चार असलेल्या लघुंमधे तोडायची सूट आहे. ही सूट अधोरेखित केली आहे.  अन्य गुरूंना दोन स्वतंत्र लघु करता येत नाही. हा नियम पाळल्याने ताल/लय सौंदर्य जपलं जातं.

दोन स्वतंत्र उच्चार नसलेले लघु नेहमी एक गुरूच मानले जाताता. उदाहरणार्थ सहाव्या शेरात एक शब्द आहे कठिन. इथे “ठिन्” असा उच्चार असलेली दुसरी श्रुती एक गुरूच मानली जाते. हे जोडलेल्या लघुंचं उदाहरण आहे. वृत्तात कुठे “लल” आवश्यक असेल आणि अशी श्रुती वापरली तर तो दोष मानला जातो कारण हे दोन लघु स्वतंत्र नाही.

गझलेत मान्य आवर्तनं – गाललगागा / गागागालल / गाललगालल / गागागागा

चार गुरूंच्या आवर्तना पुढे-मागे एक किंवा अधिक गुरू असलेले वृत्त वापरले जातात.

१) गा गागागागा गा (हम आपकी आंखोमें, इस दिल को बसा दें तो)
२) गा गागागागा गागा (पायांशी आला होता धावून फुलांचा रस्ता)
३) गा गागागागा गागागा (इस रंग बदलती दुनियामें, इंसान की नीयत ठीक नही)

मधल्या चार गुरूंना वरची सूट लागु आहे. (मला वाटतंय तीसर्या वृत्तात शेवटच्या तीन गुरु पैकी दुसर्या गुरूला पण ही सूट लागू आहे.)

माझ्या मते हे नियम नंतर तयार झाले आहेत. आधी वृत्त वापरणार्यानां त्याच्यांतला नैसर्गिक लय जाणवला असावा. उदाहरणार्थ मला खातरी आहे की वैभव देशमुख ह्यांना ह्या नियमांची माहिती नव्हती. तरी उपजत समज प्रमाणे – intuitively – त्यांनी ह्या नियमांचं पालन केलेलं आहे. त्याच्या गझलेच्या वृत्तबद्ध पठनाचा विडियो पोस्ट करतोय. एखाद जागा सोडली तर बाकी ठिकाणी हे नियम काटेकोरपणे पाळले गेले आहेत. (दिवस शब्दाचा गाल उच्चार कसा वाटतो ते पण पहा)

मात्रावृत्तांपेक्षा हे नियम जास्त बंधनकारक आहेत पण मग मात्रावृत्तांच्या सर्व सूट वापरल्यावर लय इतका सहज राहत नाही हे ही तितकच खरं.

पायांशी आला होता धावून फुलांचा रस्ता
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा रस्ता

चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळविले आहे मिळवून फुलांचा रस्ता

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन् गंध स्वताचा गेला विसरुन फुलांचा रस्ता

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
आलीस कपाळा वरती गोंदून फुलांचा रस्ता

ते वेड तुझ्या प्रितीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतून चालत आलो समजून फुलांचा रस्ता

संभाळ स्वताला थोडे हे रडणे थांबव आता
जाईल तुझ्या अश्रूंनी वाहून फुलांचा रस्ता

हाताला देऊन हिसका ते दिवस पळाले मागे
अन् पायाखालुन गेला निसटून फुलांचा रस्ता

– वैभव देशमुख

Posted in Uncategorized | 6 Comments

उर्दु बहर मधे सूट कश्या घेतात

श्री विवेक काणे ह्यांच्या “कठपूतळी” गझल संग्रहाच्या प्रस्तावनेतील काही गद्यखंडाचा अनुवाद. मराठी वाचकांच्या अनुकूलतेसाठी त्यातल्या गुजराती उदाहरणां ऐवजी उर्दु उदाहरणे घेतली आहेत.

बहरः- गागाल लगागाल लगागाल लगागा

खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये प्रत्येक ओळीवर ‘u’ असे चिन्ह आहे त्या ह्या छंदातील लघु मात्रेच्या जागा आहेत. . हा छंद विशिष्ट एवढ्या साठी आहे की त्या मध्ये तीन वेळा दोन लघु मात्रा एकत्र येतात, व त्या दोन लघु म्हणूनच जपाव्या लागतात (त्यांना एकत्र करून एक गुरु करता येत नाही), अन्यथा तो छंददोष होतो.

aaaaau  u           u   u           u u
दुनियामें हम आये हैं तो जीना ही पडेगा
aaaaau  u           u   u           u u
जीवन है अगर जहर, तो पीना ही पडेगा

aaaaau  u            u  u                uu
उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहेते
aaaaaau u            u u                 uu
अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहेते

aaaau  u            u  u         u  u
सीने में जलन आँख में तूफान सा क्यूँ है
aaaaau  u             u  u      u  u
इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यूँ है

aaaaau  u            u  u          u u
दुनियामें हूँ दुनिया का तलबगार नहीं हूँ
aaaau u           u   u        u u
बाज़ार से गुज़रा हूँ, ख़रीददार नहीं हूँ

aaaaaau u            u  u        u  u
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
aaaaaaau u        u  u          u  u
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

उदाहरणांचे वृत्तबद्ध पठन ऐकायला व्हिडियो पहा. ह्या उदाहरणांच्या आधारावर बहरच्या उत्तम वापराचे काही प्रमुख लक्षण ह्या प्रमाणे आहेतः

१) अधोरेखित केलेले उच्चार, प्रथम द्रष्टिने काना/मात्रा/वेलान्टी पहाता गुरू वाटत असले तरी पण, लघु म्हणून प्रयोजिलेले आहेत. परंतु, ह्या सर्व जागेंवर लघु उच्चार केल्याने शब्दाच्या सौंदर्याचा ह्रास होत नाही, किंवा बहर-बद्ध पठनात विक्षेप येत नाही.

२) बोल्ड केलेले, खरे पाहता एक एका गुरु पेक्षा मोठे वाटणारे हे उच्चार एक गुरु म्हणून वापरलेले आहेत. इथे पण शब्दाचे सौंदर्य विद्रुप होत नाही व लयात पण व्यत्यय येत नाही.

३) ह्या प्रमाणे, १ व २ मधे दाखविल्या प्रमाणे ह्या सर्व सूट विवेकपूर्ण आहेत. संख्येच्या द्रष्टीने पाहिले तर अश्या सूट एका ओळीत तीन किंवा चार पेक्षा जास्त नाही.

४) बहुतेक सुटी एकमेकांपसून अंतर ठेवून घेतलेल्या आहेत. एका पाठोपाठे येणार्या सुटी दोन हून अधिक नाहीत. त्याने पंक्तिचे संतूलन सांभाळले जाते.

५) जिथे दोन लघु एका बरोबर येतात  तीथे बहुतेक दोन पैकी एक (किंवा काही ठिकाणी दोन्ही)लघु सूट घेतलेल्या गुरुचे बनलेले आहेत. त्याने त्यांचे उच्चार दोन स्वतंत्र लघु म्हणूनच करावे असे प्रस्थापित होते आणी बहरचे सौंदर्य निखरून येते.

६) जिथे दोन्ही लघु शुद्ध आहेत (अर्थात त्या पैकी एक ही सूट घेउन लघु केलेगा गुरु नाही – खरीददार नहीं हूं) तीथे पहिला लघु शबदांती येतो आणी दुसर्या लघुने नवा शब्द सुरु होतो. ह्या दोन लघुंमधे सहजतेने विराम घेता येतो व त्यांना एकत्र करून एक गुरु उच्चार करणे कठीण आहे. ही व्यवस्था संस्कृत वृतांमधल्या “यति” च्या व्यवस्थे सारखी आहे. अश्या पध्धतीने इथे पण दोन स्वतंत्र लघु उच्चार राहतत आणी बहरचे सौंदर्य जपले जाते.

गझलच्या बहरमधे घेण्यात येणार्या सुटींचे प्रकार, त्यांचे प्रमाण आणी त्यांचा आकृतीबंध गझलकाराच्या वैयक्तिकतेला जागा देतात व त्याचा कला-विवेक दर्शवितात.

– हेमंत पुणॅकर

Posted in Uncategorized | 1 Comment

लपवावी नजर, डोळाही चुकवून पहावे – विवेक काणे ‘सहज’

aaaaau  u           u u           u u
लपवावी नजर, डोळाही चुकवून पहावे
aaaau u         u  u          u u
मुद्दाम स्वतःलाच पणहून पहावे

aaaaaau  u            u u        u  u
दिसतो का तरी तळ जरा शोधून पहावे
aaaaau  u            u u         u u
विहिरीत मनाच्या कधी वाकून पहावे

aaau u            u  u      u  u
संपूर्णसा इतिहास तपासून पहावे
aaaaau   u        u u          u    u
अडले का जगाचे कुणा वाचून ? पहावे !

aaaau  u        u   u           u  u
मारावी कधी हाक स्वतःला ही उगाचच
aaaau  u        u   u          u  u
पडसाद तरी येतो का ? ऐकून पहावे

aaaaau  u           u u       u u
प्रतिमेत ‘सहज’ कैद न होईल कधीही
aaaaau  u               u u         u  u
साच्यात सहज कुठल्याही ओतून पहावे

– विवेक काणे ‘सहज’

बहरः- गागाल लगागाल लगागाल लगागा
प्रत्येक ओळीवर ‘u’ असे चिन्ह आहे त्या ह्या छंदातील लघु मात्रेच्या जागा आहेत.

विवेक काणे हे उर्दुत ही गती असलेले गुजरातीतले एक मान्यवर गझलकार. फेसबुकवर झालेल्या एका चर्चेत त्यांनी अरबी/फारसी बहर विषयी कही मुद्दे मांडले होते. ते मी इथे उद्‍धृत करत आहे.
——-
हेमंत व अन्य मराठी कवी मित्रांनो,
वरील चर्चेच्या संदर्भात काही मुद्दे मांडणे मला गरजेचे वाटते.
१. ‘वृत्त’ हा शब्द संस्कृत ‘अक्षरमेळ’ छंदांसाठी योजिला जातो. ज्या छंदांची व्याख्या अक्षरांच्या संख्ये वरून होत नाही त्यांच्या साठी ‘छंद’ किवां उर्दूत म्हणावे तर ‘बहर’ असा शब्दप्रयोग करावा.
२. गझल कुठल्याही ‘वृत्तात’ किवां ‘छंदात’ लिहिता येते हे जरी खरे असले तरी सहसा ती अरबी-फारसी छंदांमध्ये का लिहिली जाते याचा विचार मराठी गझलकारांनी करावयास हवा. माझ्या नम्र मते याचे कारण इतके च कि संस्कृत वृत्तांमध्ये किवां इतर छंदांमध्ये लिहिलेल्या गझल विशेष परिणामकारक ठरत नाहीत असा अनुभव हिंदी व गुजराती दोन्हीं भाषांमध्ये आला आहे. (मराठीत सुद्धा साधारण असाच अनुभव आहे असा माझा समज आहे. चुकीचा असल्यास सांगावे). याचे कारण अरबी-फारसी छंद ज्या पध्धतीने प्रयोजिले जातात त्यात दडलेले आहे. या छंदांमध्ये शब्द योजना करतांना कुठे-कुठे आणि किती प्रमाणात सूट घेता येते याचे काही नियम (आणि त्यांना काही अपवाद ही) व काही परंपरा आहेत.
३. अरबी-फारसी छंद योजून हवा तो परिणाम साधायचा असेल तर हे नियम व या परंपरा जाणून घेऊन त्यांसकट हे छंद प्रयोजिले गेले पाहिजेत. गुजराती गझलने नेमके हेच केले आहे आणि म्हणून च आज ती इथवर येऊन पहोचली आहे.
४. जवळ जवळ दीडशे वर्षांच्या इतिहासात सुरवातीची कित्येक दशके गुजराती गझल उर्दूचे बोट धरून चालली. अरबी-फारसी छंद, ते प्रयोजीण्याचे नियम व परंपरा तिने आत्मसात केल्या आणि तेव्हां कुठे आज ती उर्दू च्या समकक्ष मानली जाऊ लागली आहे.
५. गुजराती भाषेमध्ये सुध्धा, गझल व्यतिरिक्त ज्या कविता आहेत (ज्यांत संस्कृत वृत्त व इतर छंदांचा वापर होतो) त्यांत गुजराती भाषा अरबी-फारसी छंदांसारखी वापरता येत नाही. भाषेचे दोन प्रकारचे वापर इथे सुद्धा आहेत च.
६. तात्पर्य एवढेच कि छंदात भाषा कशी वापरावी हे छंद ठरवतो, भाषा नव्हे. अरबी-फारसी छंद मराठी भाषेत आणायचे असतील तर ते त्यांच्या नियम व परम्परांसकट आणावे लागतील, त्या शिवाय ते परिणामकारक ठरणार नाहीत. (हे मराठी गझलकारांना जेवढे लवकर समजेल तेवढे मराठी गझल साठी उत्तम ठरेल). तसे करायचे नसेल, तर सरळ संस्कृत वृत्तांमध्ये गझल लिहून ती कशी परिणामकारक करता येईल हा प्रयत्न करावा.
७. अश्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी गझल अजून बाल्यावस्थेत आहे. हळू हळू, आज न उद्या कालक्रमाने मी वर सांगितलेल्या गोष्टी तिच्या ध्यानात येतील आणि मराठी गझल सुद्धा स्वतःचे स्थान निर्माण करील असा मला विश्वास वाटतो.
मराठी कवी / गझलकार मित्रांना माझ्या अनेक शुभेच्छा.
आपला नम्र…विवेक काणे ‘सहज’

———————–

ह्यावर त्यांचाशी चर्चा करतानां मी त्यांना अरबी/फारसी बहर वापरून एक मराठी गझल लिहायची विनंती केली आणी त्यांनी मला ही गझल पाठवली. वरील गझलेच्या पठनाचा व्हिडियो ह्या पोस्ट बरबर ठेवलेला आहे. तो ऐकायला विनंती आहे.

गझलेत अन्डरलाइन केलेले अक्षर गुरु असून सुद्धा लघु म्हणून प्रयोजीलेले आहेत आणी तरी ते शब्द समजायला कठीण जात नाही. हीच अरबी/फारसी बहरची मजा आहे, ताकद आहे. जास्त माहिती साठी उर्दु बहर मधे सूट कश्या घेतात हा लेख वाचायला विनंती.

एक अजून नोंधण्या सारखी गोष्ट म्हणजे एक पेक्षा जास्त मत्ल्यांचे प्लेसमेंट. उर्दु गझलेच्या नियमांप्रमाणे एक पेक्षा जास्त मत्ले असल्यास ते सर्व गझलेच्या सूरुआतीला ठेवण्यात येतात. फक्त दुसर्या ओळीत रदीफ-काफिया असणारे शेर चालु झाल्यावर मधेच मत्ला येत नाही.

– हेमंत पुणेकर

Posted in Uncategorized | 19 Comments